Pune : विकासकामात अडथळा आणणाऱ्या नगरसेविकेला आयुक्तांचा झटका; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले

नगरसेविकेच्या पतीराजांचा वाढता हस्तक्षेप चिंताजनक

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाने पुणे शहरात धुमाकूळ घातला आहे. पावसाळ्यात हे संकट आणखी भयानक होऊ नये म्हणून पुणे महापालिकेतर्फे आंबील ओढ्याच्या साफसफाईचे काम सुरू केले आहे. मात्र, या कामात विश्वासात घेतले नाही म्हणून या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर महापालिका आयुक्तांनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला. अखेर संबंधित नगसेविकेने माफीनामा सादर केल्याने प्रकरणावर पडदा पडला.

पुणे महापालिकेतर्फे शहरात पावसाळा पूर्व कामांना सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आंबील ओढ्याच्या साफसफाईचे काम सुरू केले आहे. मात्र, या कामात विश्वासात घेतले नाही म्हणून एका नगरसेविकेच्या पतीने या कामात अडथळा आणला. एवढेच नव्हेतर हे कामही थांबवले. याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली. विकासकामात कामात अडथळा आणणाऱ्या या नगरसेविकेचे पदच रद्द करण्याची तयारी सुरू केली.

दरम्यान, आता प्रकरण भलतेच अंगलट येत असल्याची कुणकुण लागताच संबंधित नगरसेविकेच्या पतीने आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोनाफोनी केली. मात्र, आयुक्त कारवाईच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नगरसेविका आणि तिच्या उपद्रवी पतीची चांगलीच पंचायत झाली. अखेर उशिरा का होईना शहाणपण सुचलेल्या नगरसेविकेने आपला माफीनामा आयुकानसमोर सादर केले. त्यानंतर हे प्रकरण मिटले.

दरम्यान, महापालिकेत महिला नगरसेविका जरी निवडून आल्या असल्या तरी त्यांच्या पतीराजांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कधी हे पतीराज महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करतात. तर, कधी महापालिकेच्या विकासकामांत अडथळा आणतात. यावेळी आयुक्तांनी महिला नगरसेविकेचे पदच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे या माननीयांच्या पतिराजांची चांगलीच फटफजिती झाली. शिवाय  त्यांना माफीनामा सादर करावा लागला. या विषयी महापालिकेत खमंग चर्चा रंगली आहे. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.