Pune : क्रेडीट मॅनेजमेंट सर्व्हिसेस’तर्फे पुण्यात ट्रस्ट आणि कंपनी कायदा सल्लागार केंद्र

एमपीसी न्यूज- क्रेडीट मॅनेजमेंट सर्व्हिसेस-सी.एम.एसतर्फे विश्‍वस्त संस्था (ट्रस्ट), बँक, यांना कंपनी कायदा व इतर उपयुक्त सल्ला सेवा देणार्‍या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ व्यवस्थापन गुरू डॉ. प्र.चि. शेजवलकर यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर होणार आहे.

‘ट्रस्ट’ म्हणजे विश्‍वस्त संस्था या कल्पनेचा स्वीकार अजून कृती आणि बंधनकारक म्हणून मनापासून स्वीकारलेला नाही. विश्‍वस्ताची भूमिका ही मुख्य संरक्षकासारखी असून, ती एक नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. ना नफा ना तोटा हे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या विश्‍वस्त संस्थेला काही रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असते. या सर्व बाबींवर केंद्रातर्फे अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

तसेच सुमारे एक वर्षांपूर्वी सरकारने 11 हजार संयुक्त भांडवली कंपन्यांचे परवाने रद्द केले. त्यातील काही कंपन्याची नोंदणी नावापुरतीच किंवा बेकायदेशीर उद्दिष्टांनी झाली होती. या संबंधात योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

‘सीएमएस’चे कार्य इतरही दिशांमध्ये चालू असून त्यात थकीत कर्जासाठी सल्ला, अर्बन बँकांना स्टाफसहित संचालकांना प्रशिक्षण, आर्थिक पुनरुज्जीवन आदी बाबींचा समावेश आहे.

या केंद्रात प्रमुख सल्लागार म्हणून ‘बिझीनेस एथिक्स फौंडेशनचे’ डॉ. श्री. ग. बापट, ‘वरिष्ठ बँक स्टाफ’ प्रशिक्षक प्रा. श्रीधर नागनूर, जनार्दन कुलकर्णी (माजी आर.बी.आय उपमहाप्रबंधक, मुंबई), प्रदीप भावे (ठाणे), माधव गोखले, निशिकांत देशपांडे, म. वि. गोडसे, मनोहर जोशी आणि अविनाश केतकर (सोलापूर) यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.