Pune : शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नितीन राऊत यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दखल घेतली. याबद्दल पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी डॉ. राऊत यांचे अभिनंदन केले आहे.

या बाबत काँग्रेसच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, पालिका गटनेते अरविंद शिंदे, लता राजगुरु, अजित दरेकर, रमेश अय्यर, सुजित यादव, मेहबूब नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रकात म्हटले आहे कि, रिपब्लिक टीव्हीवर २१एप्रिल रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अर्णब गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी करणारी टिपणी केली होती. त्याविरोधात देशभरातील विविध ठिकाणी पोलीसांत तक्रारी दाखल झाल्या. गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली.

यावर सर्वोच्च न्यायालयाने अन्य राज्यातील एफआयआर तपासाला स्थगिती देत असताना डॉ. राऊत यांच्या एफआयआरची दखल घेतली आणि राऊत यांच्या एफआयआरचा तपास करायला हवा आणि त्या तपासासाठी गोस्वामी यांनी पोलीसांना सहयोग करायला हवा असे बजावले. तसेच गुन्हा रद्द करण्याची गोस्वामी यांची मागणी फेटाळली आणि या गुन्ह्यात गोस्वामी यांना अटकपूर्व जामीन घ्यायचा असेल तर ट्रायल कोर्टाकडे जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणात डॉ.राऊत यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अर्णब गोस्वामी यांना संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

या लढ्यासाठी डॉ.राऊत यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत असे काँग्रेसच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.