Pune : येरवड्यात काँग्रेसतर्फे पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन

Congress protests against petrol and diesel price hike in Yerwada

एमपीसी न्यूज – पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि वडगावशेरी मतदार संघ काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात आज, शुक्रवारी सकाळी येरवडा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रिक्षा व मोटार सायकल ढकलून निषेध करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राजेंद्र शिरसाठ, संतोष आरडे, बाबा नायडू, नागेश भालेराव, ज्येष्ठ नेते प्रकाश काळे, संस्कृतीक विभागाचे शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष भुजंग लव्हे, मीडिया विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अनिस खान, सुनील थोरात, योगेश देवकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रिक्षा व मोटार सायकल ढकलून निषेध व्यक्त केला. पेट्रोल व डिझेलची भाववाढ तात्काळ रद्द केली नाही तर केंद्र सरकार विरोधात पुणे शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश बागवे यांनी दिला.

आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांनी केले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल – डिझेलच्या किमतीमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे.

तेलाच्या किमती वाढत असल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आधीच कोरोनाचे भयंकर संकट निर्माण झाले आहे. त्याचा सामना करताना सामान्य माणसाला जीवाचा आटापिटा करावा लागत असल्याचे सकट यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.