Pune : ऐनवेळी झालेल्या पक्षांतराचा काँग्रेसला दोन मतदारसंघांत फटका; पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात काँगेसमधील काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँगेस उमेदवारांच्या तोंडाशी आलेला घास निसटला. आगामी काळात पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे.

शिवजीनागरमध्ये माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रत्येकी केवळ 5 – 5 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.शिवजीनागरमध्ये माजी महापौर दत्ता गायकवाड आणि माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी भाजप प्रवेश केला. तर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनीही भाजपचीच वाट धरली. या नेत्यांची काँगेसच्या नेत्यांनी समजूत घातली असती तर, हे दोन पराभव रोखता आले असते.

तसेच या दोन मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही चांगली मते घेतली. त्याचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. हडपसर मतदारसंघात तर मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तब्बल 34 हजार मते घेतली. त्यामुळेच योगेश टिळेकर यांचा पराभव झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

पुणे शहरात काँगेस – राष्ट्रवादीची आघाडी होती. पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीने निवडणूक लढविली. हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. खडकवासला मतदारसंघात मात्र 2500 मतांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांचा पराभव झाला.

कोथरूड मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी मनसेचे किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला होता. पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले.

काँगेसचे वरिष्ठ नेते प्रचाराला फिरकलेच नाही
पुणे शहरात काँगेसचे उमेदवार एकटेच झुंज देत होते. या पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचाराला फिरकलेच नाही. त्याउलट भाजपने राज्यापासून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना निवडणुकीत प्रचार करण्यासाठी उतरविले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like