Pune : पुण्याची जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी काँग्रेसची आढावा बैठक

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघासहित पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक बोलाविली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी सर्व इच्छुक या बैठकीत आग्रही भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या या आढावा बैठकांमध्ये गुरुवारी पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीसाठी शहर काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी गत आठवड्यात शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी शहर काँग्रेसचे सर्व इच्छुक आणि पदाधिकारी एकत्र आले आहेत. या इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीत सर्व इच्छुक पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडू नये यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.