Pune : बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक- विकास पानवेलकर

एमपीसी न्यूज – प्रत्येक बांधकाम कामगाराची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. असे झाल्यास अधिकाधिक बांधकाम मजुरांना शासनाकडून राबवल्या जाणा-या विविध सहाय्य योजनांचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन कामगार उपायुक्त विकास पानवेलकर यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व अन्य कामगार कल्याण मंडळामार्फत (बीओसीडब्ल्यू) राबवल्या जाणा-या विविध योजनांची माहिती कामगारांना देण्यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’, अनुलोम संस्था आणि कामगार विभागाच्या वतीने खास जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पानवेलकर बोलत होते.

‘क्रेडाई- पुणे मेट्रो’चे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, संस्थेच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, शासनाच्या कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त एन. ए. वाळके, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, अनुलोम संस्थेचे प्रादेशिक प्रमुख मुकुंद माने, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का, कामगार कल्याण समितीचे सदस्य मिलिंद तलाठी, पराग पाटील, क्रेडाई-पुणेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी, कल्पतरू समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीळकंठ सरदेसाई, आस्थापना अधिकारी संजय चव्हाण या वेळी उपस्थित होते.

बाणेरमधील ‘कल्पतरू जेड रेसीडन्स’ या बांधकाम प्रकल्पावर हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ‘क्रेडाई-पुणे मेट्रो’चे सदस्य त्यांच्याकडील कामगारांच्या नोंदणीसाठी प्रयत्नशील असून गेल्या काही महिन्यांत काही कामगारांना शासनाच्या योजनांच्या आर्थिक लाभही मिळाला असल्याचे जे. पी. श्रॉफ यांनी सांगितले. कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यात काही अडचण आली तरीही क्रेडाई- पुणे मेट्रो मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

पानवेलकर म्हणाले, “‘बीओसीडब्ल्यू’ मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी वयाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत आणि कामगाराचे छायाचित्र अशी प्राथमिक कागदपत्रे देखील पुरेशी आहेत. शिवाय कामगाराची एकदा एका बांधकाम साईटवर नोंदणी केल्यानंतर दुस-या बांधकाम साईटवर स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सर्व कामगारांची नोंदणी झाल्यास त्यांना अधिक संख्येने शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल”

मुजावर यांनी कामगारांना मिळणारी आरोग्यविषयक मदत, तसेच त्यांच्या अपत्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे आर्थिक लाभ याबद्दल माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.