Pune : बांधकाम साईटवरील सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणा-या संस्थांचा गौरव

एमपीसी न्यूज- ‘पुणे कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन’तर्फे दिल्या जाणा-या ‘पीसीईआरएफ – कुमार बेहरे कंस्ट्रक्शन सेफ्टी अॅवॉर्ड २०२०’ या पुरस्कारांमध्ये ‘मिलेनियम इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टर्स’ यांनी रहिवासी गृहप्रकल्पांमध्ये, तर ‘लुंकड रिआल्टी’(स्काय वन काॅर्पोरेट पार्क एलएलपी) यांनी व्यावसायिक-उप-व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सुवर्ण पुरस्काराचा मान मिळवला आहे.

बांधकाम क्षेत्रात कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी अधिकाधिक काळजी घेतली जावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणा-यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.

पीसीईआरएफ आयोजित ‘काँस्ट्रो 2020’ या प्रदर्शनात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या हस्ते नुकतेच या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योजक व या पुरस्कारांच्या प्रायोजकांपैकी अशोक व रघुनंदन बेहेरे, ‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष विश्वास लोकरे, उपाध्यक्ष संजय वायचळ, मानद सचिव नीळकंठ जोशी, खजिनदार जयदीप राजे, पुरस्कारांसाठीचे निमंत्रक रामनाथ भट, सुरक्षा तज्ज्ञ व ज्यूरी सतीश नायर, वास्तुस्थापत्यकार, ज्यूरी दर्पणा आठले, व्ही. एन. सोलापूरकर आदि या वेळी उपस्थित होते.

रोहन बिल्डर्स (रहिवासी गृहप्रकल्प), अँप्लस एनर्जी सोल्यूशन्स (पायाभूत सुविधा प्रकल्प), स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. (औद्योगिक प्रकल्प), भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. (व्यावसायिक-उप व्यावसायिक प्रकल्प) आणि कोलते पाटील आय व्हेन टाऊनशिप्स (नवीन प्रकल्प) यांना ‘पीसीईआरएफ – कुमार बेहरे कंस्ट्रक्शन सेफ्टी अॅवॉर्ड 2020’ मधील रौप्य पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या पुरस्कारांचे हे सातवे वर्ष असून त्यासाठी सात विविध विभागात अर्ज करता येतात. विजेत्या बांधकाम संस्थांनी त्यांच्या साईटवर ‘बीओसीडब्ल्यू’ अर्थात ‘इमारत व इतर बांधकाम कामगार कायद्या’च्या नियमांची यशस्वी अंमलबजावणी केली होती. तसेच कामगारांसाठी उभारलेला निवारा व त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच साईटवर बांधकाम सुरू असताना घडणा-या कामांची नोंद ठेवण्यात काही उल्लेखनीय गोष्टी राबवल्या होत्या.

”माणसाचा जीव आणि बांधकामाच्या ठिकाणची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून आपण ही खूणगाठ मनात बांधली की आपोआपच त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले जातात. बांधकाम कामगारांची बीओसीडब्ल्यू मंडळाकडे नोंदणी करणेही अतिशय गरजेचे आहे,” असे मत सुहास मर्चंट यांनी व्यक्त केले.

पुणे, मुंबई, नाशिक व अगदी उत्तर प्रदेशमधूनही एकूण 27 विकसक, कंत्राटदार, बांधकाम संस्था व कंपन्यांनी या पुरस्कारांसाठी अर्ज केले होते. परीक्षक मंडळात सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वास्तूविशारद यांचा सहभाग होता. या पुरस्कारांच्या पहिल्या टप्प्यात अर्जदार संस्थांना बांधकामाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाते. यानंतर दोन टप्प्यांमध्ये साईटवर जाऊन पाहणी केली जात असून त्यात एकदा पूर्वकल्पना न देताही पाहणी केली जाते. रामनाथ भट, सतीश नायर व दर्पणा आठले यांच्यासह व्ही. एन. सोलापूरकर, भरत आरोटे, दिलीप पाटील, अवधूत मोरे, राजेश डाके यांचा परीक्षक मंडळात समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.