Pune : जागो ग्राहक जागो ! कागदी पिशवीसाठी आकारले 8 रुपये, दंड झाला 25 हजार रुपये

एमपीसी न्यूज- बूट खरेदी केल्यानंतर ते घेऊन जाण्यासाठी दिलेल्या कागदी पिशवीसाठी 8 रुपये आकारण्यात आले. मात्र ग्राहकाने त्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारदाराला झालेल्या शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 25 हजार रुपये देण्याचा आदेश काढला आहे.

दविंदर सिंह (रा. सिक्युरिटी सेक्शन, बीआरडी, विमाननगर) यांनी रिलायन्स क्लोदिंग इंडिया प्रा. लि. ( फिनिक्स मार्केट सिटी, विमानगर) येथून 25 एप्रिल 2019 रोजी बूट विकत घेतले. त्यावेळी कंपनीने बूट ठेवण्यासाठी कागदी पिशवी दिली. मात्र त्यासाठी आठ रुपये आकारण्यात आले. सिंह यांनी आठ रुपये देण्यास आपण बांधील नसल्याचे सांगून रक्कम परत देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी चंडीगड ग्राहक आयोगाच्या निकालाची माहिती दिली. मात्र त्यांची मागणी कंपनीने फेटाळून लावली.

दविंदर सिंह यांनी याबाबत जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराला झालेल्या शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 25 हजार रुपये आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत देण्यात यावेत, असा आदेश दिला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.