Pune : महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार नोंदणी कार्यपद्धती रद्द!

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार कार्यपद्धती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्द केली आहे. तसा आदेश आज आयुक्तांनी जाहीर करून मातब्बर ठेकेदारांना दणका दिला आहे.

पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा, विकास कामे, प्रकल्प राबविताना निविदा कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र, निवेदेत भाग घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी पुणे महापालिकेकडे पूर्वनोंदणी करण्याची अट निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येते. त्यामुळे बऱ्याच इच्छुकांना या पूर्वनोंदणी अभावी निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. त्यामुळे ही अट रद्द करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. दि. 24 जानेवारी 2020 रोजी महापालिकेच्या खातेप्रमुखांची बैठक घेण्यात आली.

ई- निविदा पद्धतीत अधिक पारदर्शकता व निकोप स्पर्धा होण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. यापुढे पुणे महापालिकेकडे पूर्वनोंदणी करणे आवश्यक राहणार नाही. हा निर्णय दि. 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. कार्यलयीन आदेशाच्या दिनांकापासून अस्तित्वातील ऑनलाइन ठेकेदार नोंदणी प्रणाली बंद करून प्राप्त सर्व अर्जावरील कार्यवाही स्थगित करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.