Pune : सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या महापालिका पथकास सहकार्य करा -महापौर

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पुणे महापालिकेच्या पथकाला सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाने आजतागायत सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर यशस्वी उपाययोजना अंमलबजावणी करीत आहेत. परंतु, घरोघरी जाणाऱ्या मनपा पथकातील कर्मचाऱ्यांना काहीप्रसंगी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

घरामध्ये परदेश प्रवास करून कोणी आलेले आहेत का? घरातील कोणाला आजारपण, थंडीताप,खोकला, सर्दी, अथवा काही कोरोना सदृश लक्षणे दिसून येत आहे का,? विलगिकरण कशाकरिता व आवश्यकता काय?, महत्वाचे उपाय, अशी सर्व माहिती पथकातील कर्मचारी विचारून नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करीत आहेत. मात्र, अजूनही काही नागरिकांकडून जलद सहकार्य व आवश्यक माहिती देण्याचे टाळले जात आहे.

अशा प्रकारे मनपा पथकाला माहिती न देणे, लक्षणे असताना न सांगणे, संशयित व्यक्तींचे नाव, पत्ते अथवा पुरेशी माहिती देत नसल्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रभावी उपाययोजना राबविता येत नाही, असे महापौर म्हणाले.

लोकशाही दिन स्थगित
कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्तिथीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना अंतर्गत १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी, लॉकडाऊन केलेले आहे. या पार्श्वभूमीवर सभा, बैठका, नागरी समूह एकत्रित येणे अशा बाबींवर वरीलप्रमाणे कारणास्तव एकूणच बंदी असल्यामुळे पुणे महानगरपालिकेत दरमहा पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाणारा लोकशाही दिन होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.