Pune : राज्यातील कोरोनाचे संकट संपलेले नाही : मुख्यमंत्री

Corona crisis in the state is not over: CM : आपल्याला कोरोना सोबतच जगावे लागेल

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचे संकट संपलेले नाही. आणखी किती लाटा येतील माहिती नाही. पण, आता आपल्याला कोरोना सोबतच जगावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच पुण्यातील विधान भवन येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहे.

पुणे महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य शासन केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. राज्य शासनातर्फे जेवढी शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले.

मुंबईत सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण वाढत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने टास्कफोर्स स्थापन केले. आता परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. तर, पुण्यावर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारीक लक्ष आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिवस मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ते पुणे जिल्हा आणि शहरासाठी कोणती महत्वपूर्ण घोषणा करणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.