Pune : कोरोनाचे संकट संपलेले नाही, पुणेकरांनी काळजी घ्यावी : महापौर

एमपीसी न्यूज – आज, शुक्रवारी शहरात चार हजारांच्या पुढे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हे संकट संपले नसून, पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

माजी उपमहापौर, नगरसेवक ऍड. प्रसन्न जगताप यांनी हिंगणे, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड परिसरात आतापर्यंत अन्नधान्याचे 5 हजार किट वाटप केले. आज काही किट वाटप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्यांना करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे उपस्थित होते. महापौर म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या सामान्य पुणेकरांचे अतोनात हाल होत आहेत. सध्या भयंकर परिस्थिती आहे. या काळात स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी पुढे येऊन गोरगरीब नागरिकांना धान्यवाटप, जेवण व इतर मदत करीत आहेत.

संकटाच्या काळात अनेक माणसे मदत करीत आहेत. त्यांचे हे कार्य महत्वपूर्ण असून, ते कधीही विसरता येणार नाही. लोकप्रतिनिधीचे काम केवळ रस्ते, पाणी, लाईट एवढ्या पुरतेच मर्यादित नसून त्यांनी इतरही सामाजिक काम करण्यावर भर द्यावा, असा सल्लाही महापौरांनी यावेळी दिला.

कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी एकत्र यावे. त्यातून आपण कोरोनाचे संकट परतावून लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, पोलीस, महापालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पुणेकरांनी पालन करावे. आज शहरात काय सुरू आहे, याचा आढावा, पत्रकार मांडत असतात, असेही महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.