Pune: आम्ही सर्वजण कंटाळलोय, तरीही शांत राहण्याचा प्रयत्न करतोय; इटलीत राहणाऱ्या भारतीय दाम्पत्याची कहाणी (व्हिडिओ)

'कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकाने संयम राखून घरातच राहावे'

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – पुण्या-मुंबईत अडकलेल्या लेकराला फोन करून लगेच गावाकडं निघून ये, तुला आयुष्यभर सांभाळते, अशी म्हणणारी आई आपण ऐकली आहे. घाबरून, काळजीपोटी आपली अवस्था केविलवाण्या शब्दात फोनवरून मित्राला सांगणारा शहरात अडकलेला मित्र सुद्धा आपण ऐकला आहे. त्याला धीर देणारा मित्र सोशल मिडियावर चांगलाच गाजला.

पोटाची खळगी भरण्यासाठी, भाकरीएवढा चंद्र शोधण्यासाठी पुण्या-मुंबईसारख्या मायानगरीत गेलेली गावाकडची कोकरं आईच्या मायेने ताबडतोड बोलावून घेतली. आपली पोरं गावाकडे सुखरूप पोहोचताच सर्वांनी निश्वास सोडल्याचं चित्रही आपण पाहत आहोत. पण सातासमुद्रापल्याड दूरदेशी नोकरी निमित्त गेलेलं पोरगं आणि सून जेंव्हा इटलीसारख्या देशात अडकतं तेंव्हा आईसोबत संपूर्ण कुटुंब आणि गावाचाच जीव टांगणीला लागतो.

इटलीत अडकलेल्या मित्राला गावाकडचे मित्र दररोज फोन, मेसेजवरून खुशाली विचारतात. गावातली मंडळी फोन, मेसेज करून सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात. घरातले क्षणाक्षणाला फोन, मेसेज करून सारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. सर्वांच्या फोन आणि मेसेजला ते दाम्पत्य ‘आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही आमची खूप काळजी घेतोय’ एवढंच सांगतात. त्यांच्या या दोन वाक्यांचा घरच्यांना कधीच कंटाळा येत नाही, किंबहुना त्यांच्या तोंडून केवळ हीच दोन वाक्ये ऐकण्यासाठी घरचे वारंवार संवाद साधत असावेत.

‘संकट कितीही गंभीर असलं तरी हा महाराष्ट्राचा मावळा त्याला खंबीर आहे’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याचा प्रत्यय या एका घटनेत येतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जवळील बाभूळगाव येथील मूळ रहिवासी असलेले आणि नोकरीनिमित्त इटलीत स्थायिक झालेले दीपक शिंदे आणि अश्विनी पवार या दाम्पत्याची ही कहाणी आहे. लग्न झाल्यानंतरही त्यांनी आपली मूळ नावे कायम ठेवल्याने तुम्हाला नावांमध्ये काहीतरी घोळ झाल्याचं वाटू शकतं, पण असो कुणीतरी म्हटलंय ‘नावात काय ठेवलंय.’

दीपक आणि अश्विनी हे मागील काही वर्षांपासून नोकरीनिमित्त इटलीमध्ये वास्तव्यास आहेत. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’ असे म्हणत ते आता भारताप्रमाणेच इटलीवर देखील प्रेम करू लागलेत. तिथले लोक, भाषा, संस्कृती, परंपरा यांच्याशी त्याचं चांगलंच मेतकुट जमलं आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने इटलीत जरा जास्तच हाहाकार माजवला आणि संपूर्ण जग याबाबत विचार करू लागले.

इटलीतील कोरोनाची परिस्थिती, लोक घेत असलेली काळजी, अनेक दिवसांपासून घरात कोंडून घेऊन शोधलेले मनोरंजनाचे मार्ग आणि अन्य अनेक विषयांवर या दाम्पत्याने ‘एमपीसी न्यूज’शी चर्चा केली.

इटलीसारख्या बळकट युरोपीय देशावर शहरेच्या शहरे बंद करण्याची वेळ का आली याबाबत सांगताना अश्विनी म्हणतात, “इटलीमध्ये कोविड-19 (कोरोना) ची पहिली नोंद झाली त्याला आता चार आठवडे झाले आहेत. पहिल्या दोन दिवसातच सुमारे 80 लोकांना याची बाधा झाली आणि दोघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उत्तर इटलीमध्ये कोरोनाने प्रसार केला. त्यानंतर फार कमी कालावधीत मिलान, व्हेनेटो मार्गे दक्षित इटलीत कोरोना पोहोचला. बाधितांची संख्या दिवसाने नव्हे तर तासाने वाढत होती. सुरुवातीला उत्तर इटली आणि त्यानंतर एका आठवड्यात संपूर्ण देश बंद करून देशात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला.

पुढे बोलताना अश्विनी म्हणतात, “दोन आठवड्यांपासून अधिक काळ झाला आहे. आम्ही सर्वजण आपल्या घरात आहोत. देशातील सर्व कार्यालये, कारखाने, गिरण्या, बंदरे, चर्च, बार, रेस्टोरंट, उद्याने, मॉल्स, शाळा, कॉलेज सर्वकाही बंद आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारी दुकाने सुरु आहेत. आम्ही सर्वजण तणावग्रस्त आहोत, काळजीत आहोत, कंटाळलेले आहोत, नाराज आहोत, परंतु तरीही शांत राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. घरातच राहून देशातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी लढण्यासाठी मदत करीत आहोत.”

दीपक यांनी सांगितले की, “स्वताला आपल्या मर्जीविरुद्ध दहा दिवस घरात कोंडून घेणं किती त्रासदायक आणि निराशाजनक असू शकतं हे मला चांगलंच माहिती आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी इटालियन सरकारने 6 कोटी लोकांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अतिशय गरजेचे होते. कारण, इथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा कोलमडून पडू पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये चार आठवड्यात 53 हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून सुमारे पाच हजार लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

आम्हाला केवळ मेडिकल आणि सुपरमार्केटमध्येच जाण्याची परवानगी आहे. सुपरमार्केटमध्ये देखील एकावेळी केवळ सहा ते आठ लोकांना प्रवेश दिला जातो. सुपरमार्केटच्या बाहेर उभे राहताना सुद्धा किमान तीन मीटर अंतर ठेऊन उभं राहावं लागतं. मित्रांना, कुटुंबियांना मिठी मारण्याची सवय सुद्धा कोरोनाने थांबवली आहे. जर कोणाला प्रवास करायचा असेल तर एक फॉर्म आपल्या सोबत बाळगावा लागतो. त्यामध्ये प्रवासाची संपूर्ण माहिती आणि प्रवासाची आवश्यकता याबाबत विवरण द्यावे लागते. सरकारी नियमांचे पालन न करणा-यांना 206 युरो (सुमारे 17 हजार रुपये) एवढा दंड भरावा लागतो. त्यानंतर तुरुंगात जाण्याची सुध्दा वेळ येऊ शकते. सरकारने घातलेले निर्बंध आणि अटींचे पालन करणे ही एका आदर्श नागरिकाची जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही एक आदर्श नागरिक म्हणून सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करीत आहोत.”

त्यांनी शोधला स्वतःच्या मनोरंजनाचा मार्ग

माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजापासून दूर राहू शकत नाही. मित्रांसोबत बाहेर फिरायला, जेवायला जाणं, मित्रांना भेटणं, चित्रपट पाहणं ही तर इटालियन नागरिकांची खासियत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना घरात कोंडून राहणं खूपच त्रासदायक आहे. अशा गंभीर परिस्थितीतही इटालियन नागरिकांनी मनोरंजनाचा मार्ग शोधला आहे. इटालियन नागरिक आता आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये थांबून वाद्ये वाजवतात. कोणी गाणी म्हणतात तर कोणी त्यांना टाळ्या वाजवून दाद देतात.

अश्विनी म्हणाल्या, “मला आवडणारे चित्रपट या काळात मी पुन्हा पुन्हा पाहते. घरी दोघेच असल्याने आपापले छंद जोपासतो. नवीन काहीतरी शिकण्याची धडपड सतत सुरु असते. व्यायाम करणे, नवीन पाककृती बनविणे, असे एक ना अनेक छंद आम्ही पूर्ण करीत आहोत. फोनवरून इथल्या मित्रांशी गप्पा मारून देशातील परिस्थितीबाबत चर्चा करतो आणि एकमेकांना भावनिक आधार देतो. आम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आम्ही गर्दीपासून दूर आहोत, आपल्या घरात आहोत, तोपर्यंत अम्हीला काहीही भीती नाही.

आपण वेळोवेळी आणि अवेळी येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असतो. पण भारतापासून दूर असल्यामुळे पाहुणा आणि त्याचा पाहुणचार नावाचा प्रकार फार क्वचित घडतो. त्यामुळे जास्तीच्या किराणा मालाची साठवण करण्याची आवश्यकता भासत नाही. पण जास्तीच्या किराणा माल तसेच जीवनावश्यक गोष्टींची साठवण करण्याची भारतीय सवय असल्याने त्याचा या काळात प्रचंड फायदा झाला.”

अन आम्ही तत्काळ भारतात न येण्याचा योग्य निर्णय घेतला….

इटलीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समजल्यानंतर मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील प्रत्येकाने लगेच भारतात येण्याचा सल्ला दिला. दोन्ही कुटुंबे काळजी करू लागली. पण प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार केल्यानंतर आम्ही भारतात न परतता इटलीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. कारण, इटलीत घरात राहण्यात काहीही धोका नाही, पण प्रवासात मात्र याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. हा संसर्ग घेऊन आम्ही आमच्या देशात, गावात पोहोचलो, तर त्यातून कुटुंबाला देखील याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही इटलीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण देश बंद आहे, प्राणघातक रोगाविरुद्ध लढत आहे, अशा वातावरणही तुम्ही तिथे राहताय? याची भीती नाही का वाटत? असा प्रश्न विचारला असता दीपक आणि अश्विनी म्हणतात, “आम्ही आमच्या कुटुंबापासून, देशापासून खूप दूर आहोत, याची भीती कधीच वाटत नाही. कारण आम्ही सुरक्षित आहोत. पण इथे दररोज मरणा-या लोकांची संख्या तीन आकडी आहे. दररोज सायंकाळी सहा वाजता हा आकडा सांगितला जातो, तेंव्हा खूप दुःख होते. आयुष्याच्या लढाईतून न परतलेल्या त्या सर्वांसाठी आम्ही दुःखी आहोत. त्यांच्या परिवारासाठी, मित्रांसाठी दुःखी आहोत. आरोग्य सेवेत अथकपणे काम करणा-या प्रत्येक घटकासाठी दुःखी आहोत. आमच्या जुन्या घराच्या समोर राहणा-या आजी आम्हाला दररोज हाक मारून आमची चौकशी करायच्या, ती हाक आता कधीच ऐकायला मिळणार नाही, याचं दुःख आहे. काही दिवसांपूर्वी उद्यानात भेटलेल्या आणि मनमोकळेपणे हसणा-या त्या आजी, सुपरमार्केटमध्ये उंच फळीवरून दह्याचा डबा काढून देणारे आजोबा यांच्या बाबत दुःखी आहोत.

पण या सगळ्यात एका गोष्टीचं खूप समाधान वाटत आहे. नातेवाईक, मित्र, शेजारी राहणारे अनेकजण या परिस्थितीत फोन आणि मेसेज करून आमची चौकशी करत आहेत. सुरक्षित, व्यवस्थित राहण्याचा सल्ला देत आहेत. खुशाली विचारत आहेत. आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही अनोळखी सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना पाठवून आमच्या मनाला बळकटी देत आहेत. इथे सुद्धा जे शेजारी आहेत, ते सर्व वेगवेगळ्या देशातील आणि धर्मातील आहेत. आम्ही सर्वजण एकमेकांना सर्वतोपरी मदत करीत आहोत.

या सर्व गोष्टी, सर्व मते, चिंता, परिस्थिती, दुःख यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अजूनही आशावादी आहोत. आम्ही एक बलवान आणि मजबूत देश बनून या संकटाशी लढा देत आहोत. कारण प्रत्येक इटालियन नेहमी म्हणतो, andra tutto bene! (सर्वकाही ठीक होईल !)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.