Pune Corona Good News: शहरातील 57 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, राहिले फक्त 38 टक्के सक्रिय रुग्ण!

Pune Corona Good News: 57 per cent patients in the city overcome corona, only 38 per cent active patients remain!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी 57 टक्के रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पाच टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आता शहरात फक्त 38 टक्के रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली. कोरोना हारणार, पुणेकर जिंकणार, या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांचा महापौरांनी पुनरुच्चार केला.

शहरात नऊ मार्चला कोरोनाचे पहिले दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर 81 दिवसांत पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत वाढत 6093 झाली आहे. त्यापैकी 3450 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. शहरात 31 मार्चला कोरोनाचा पहिला बळी एका खासगी रुग्णालयात गेला. एका 52 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू त्या दिवशी झाला. त्यानंतर मागील दोन महिन्यात हा आकडा हळूहळू वाढत 303 वर जाऊन पोहचला आहे.

एकूण 6092 कोरोनाबाधितांपैकी 3450 म्हणजेच 57 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 303 म्हणजेच 5 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3753 म्हणजे 62 टक्क्यांनी कमी झाली आहे. आता शहरात एकूण 2340 म्हणजेच 38 टक्के कोरोना सक्रिय रुग्ण शिल्लक राहिले असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 116 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यातील कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त असल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आतापर्यंत पुणे शहरात एकूण 39 हजार 38 स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6093 चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. म्हणजे पॉझिटीव्ह केसेसचे प्रमाण 15.61 टक्के आहे.

पुण्यात सरसकट कोरोना निदान चाचण्या घेतल्या जात नाही. संशयित रुग्ण अथवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्याच चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यातील 15.61 टक्के चाचण्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला तरी ते प्रमाण फारसे चिंताजनक नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण पाच टक्के असले तरी त्यापैकी सुमारे 70 टक्के रुग्णांना अन्य जोखमीचे आजारही होते. त्यामुळे या सर्वांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, असा निष्कर्ष निघत नाही. त्याच बरोबर कोणतेही खात्रीशीर औषध अथवा उपचारपद्धती उपलब्ध नसताना देखील 57 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात करणे, ही खूप मोठी उपलब्धी म्हणता येईल. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनाला घाबरणे, सोडून देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी दक्षता घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like