Pune Corona Good News: शहरातील 63 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, उरले फक्त 32 टक्के सक्रिय रुग्ण!

Pune Corona Good News: 63% patients in the city overcome corona, only 32% active patients!

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 63 टक्के आता ठणठणीत बरे झाले आहेत. सुरूवातीला 10 टक्क्यांच्या वर असणारा मृत्यूदर देखील आता पाच टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे आता शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण केवळ 32 टक्के झाले आहे, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. 

पुणे शहरात आतापर्यंत एकूण 56 हजार 806 जणांच्या स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 447 जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले. या पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 4 हजार 675 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 63 टक्के आहे. महाराष्ट्र, भारत आणि जगातील सरासरीपेक्षा हे प्रमाण खूप चांगले आहे.

शहरात आतापर्यंत 369 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 4.96 टक्के आहे. हे प्रमाण राज्य, देश आणि जागतिक सरासरीपेक्षा जास्त असून कोरोनाचा मृत्यूदर आणखी कमी करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेपुढे आहे. सुरूवातीला पुण्यातील कोरोना मृत्यूदर 10 टक्क्यांपेक्षाही अधिक होता. तो आता निम्म्यापर्यंत कमी झाला आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 2 हजार 402 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 32.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 45 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

पुणे शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे, असे स्पष्टीकरण महापौर मोहोळ यांनी केले. पुण्यात सरसकट कोरोना चाचण्या करण्यात येत नाहीत. सध्या एक लाख लोकसंख्येमागे झालेल्या चाचण्यांचे प्रमाण 1,671 आहे. पुण्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांच्या तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींचेच स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तरी देखील 13.11 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे दिसून येत आहे.

कोणतेही खात्रीशीर औषध अथवा उपचारपद्धती उपलब्ध नसतानाही कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून लवकरच पुणे शहर पूर्ण कोरोनामुक्त करण्यात यश येईल, असा विश्वास महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला. कोरोनाविरुद्धच्या या युद्धात सहभागी असणारे शहरातील सर्व डॉक्टर, नर्स, अन्य रुग्णालयीन कर्मचारी, महापालिका प्रशासन, अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्ञात-अज्ञात सर्वच कोरोना योद्ध्यांविषयी पुणेकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत महापौर मोहोळ यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी पुण्यातील कोरोनाची लढाई पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.