Pune : ससूनमध्ये कोरोनामुळे आज तिघांचा बळी

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजविला असून आज (मंगळवारी) 3 नागरिकांचा बळी गेला आहे. हे सर्व नागरिक 60 ते 75 या वयोगटातील आहेत. मृतांमध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

ससूनमध्ये आज येरवड्यातील 72 वर्षीय आणि 64 वर्षीय पुरुषाचा तर, बिबवेवाडीतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आज मृत्यू झालेल्या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबेटीस, उच्चरक्तदाब, किडनी विकार व इतरही आजार होते.

ससूनमध्ये आतापर्यंत 93 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 95 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आता कोरोनाचे रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

मंगळवारी दुपारी 4 पर्यंत तब्बल 136 कोरोनाचे रुग्ण आढळले. पुणे शहरात कोरोनाचे 2700 रुग्ण आहेत. तर, जिल्ह्यात 3105 रुग्ण आहेत. आतापर्यंत 161 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत ५११, ढोले पाटील ४०९, शिवाजीनगर-घोले रोड ३२६, कसबा-विश्रामबाग ३१९, येरवडा-कळस-धानोरी भागांत कोरोनाचे २९४ रुग्ण आहेत.

भवानी पेठेत आतापर्यंत कोरोनामुळे 38 मृत्यू झाले असून, 500 च्या पार रुग्ण गेले आहेत. तर, कोरोनाचा उपचार घेऊन बरे झालेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.