Pune : शहरातील कोरोना 31 मे पर्यंत आटोक्यात येणार : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचे संकट येत्या 31 मे पर्यंत आटोक्यात येणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील ज्या 5 वॉर्डात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी 100 टक्के कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वॉर्डांमध्ये दि. 17 मे पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत.

झोपडपट्ट्या असलेल्या भागांत रोज जीवनावश्यक वस्तूंचे 6 ते 7 हजार किट महापालिकेतर्फे वाटण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे. ठिकठिकाणी पत्रे मारून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

शहरातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

त्यातील दोनशे करोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले आहेत. या पाच क्षेत्रीय कार्यालयांची हद्द करोनामुक्त करण्याची घोषणा महापालिकेने केली असून, त्यादृष्टीने या सर्व भागांत तपासणी आणखी वेगाने वाढविण्यात आली आहे.

या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. भवानी पेठ, येरवडा, ढोले-पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि कसबा-विश्रामबागवाडा या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून आजवर केलेल्या तपासणीतून दोनशेपेक्षा अधिक नागरिक सापडले आहेत.

या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आठ प्रमुख झोपडपट्ट्या असून, दाट लोकवस्तीच्या भागांत ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर अधिक लक्ष दिले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.