Pune : कोरोना तपासणीसाठी आर. एस. एस. जनकल्याण समितीची मदत : रुबल अग्रवाल

भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्सचे अमूल्य योगदान 

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी  ‘कोरोना फ्री पुणे अकॅशन’ अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आर. एस. एस. जनकल्याण समिती, फोर्स मोटर्स आणि भारतीय जैन संघटना  शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता पुढे आले आहेत,  अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. 

मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात आर. एस. एस. जनकल्याण समितीने एप्रिल अखेर रेड झोन परिसरात 2687 घरांना भेटी देउन 14,322 नागरिकांची तपासणी केली. यामध्ये संशयित रुग्ण व लक्षणे दिसून आलेल्या 93 नागरिकांना पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. 54  डॉक्टर्स व 182  स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले. महापालिका सहाययक आयुक्त, मनपाचे 39  कर्मचारी व 44 पोलीस कर्मचारीही  मोहिमेत सहभागी झाले होते.

फोर्स मोटर्स व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी  मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रभावी नियोजन करण्यात आले.  मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

या  मध्ये 1  डॉक्टर, 1  रेडिओलॉजिस्ट, नर्स व अन्य 2  कर्मचारी असे 5  जणांचे 1  पथक तयार करण्यात आले. अशा 55  मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून सुमारे 55,००० नागरिकांची तपासणी करण्यात येउन औषधोउपचार करण्यात आले. यामधील सुमारे 170  रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने त्यांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असेही रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.