Pune Corona Updates : पुणेकरांनो काळजी घ्या! आज दिवसभरात शहरात नवीन 444 कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विविध भागातील 444 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पुणे महापालिका हद्दीत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. आजपर्यंत शहरातील 9 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात सध्या 2838 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 101 रुग्ण गंभीर आहेत, तर 81 रुग्ण ऑक्सिजन द्वारे उपचार घेत आहेत.

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज दिवसभरात 6 हजार 573 नमुने घेण्यात आले. त्यामुळे पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या 38 लाख 86 हजार 60 इतकी झाली आहे.

दरम्यान, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगून शहरवासीयांनी केवळ काळजी घ्या, चिंता नको असे आवाहन सुद्धा महापौर मोहोळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.