Pune corona News : पुण्यात 4 महिन्यात 10 हजार बालकांना कोरोनाची बाधा

आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लहान मुले कोरोनाबाधित

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात झाल्यापासून मे अखेरपर्यंत चार महिन्यात 10 हजार 609 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजे 6 हजार 360 बालके बाधित झाली आहेत. ही आकडेवारी शून्य ते 10 वर्षे या वयोगटातील असून आतापर्यंत महापालिका हद्दीत आजपर्यंत सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त लहान मुले कोरोनाबाधित झाली आहेत.

जागतिक आरोग्य संघटना, केंद्रशासन तसेच साथरोग तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेनेही खबरदारीचा उपाय म्हणून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आवश्‍यक बेड, ऑक्‍सिजन बेड, लहान मुलांचे आयसीयू तसेच व्हेंटीलेटर सज्ज ठेवण्यात येत आहे.

दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश बाधित संख्या प्रौढ आणि वृद्धांची होती. त्यावेळी लहान मुलांना याची लागण झाली तरी ते जास्त धोकादायक नसेल असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे होते. तरीही त्यावेळी जुलैमध्ये 2,295, ऑगस्टमध्ये 2,308 आणि सप्टेंबर महिन्यात 2,417 या प्रमाणात लहानमुले बाधित झाली होती.

परंतु, यंदा दुसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून, फेब्रुवारीत 703 बालके बाधित झाली. मार्चमध्ये 2382 एप्रिलमध्ये 6360 आणि मेमध्ये 1164 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली.

‘तिसरी संभाव्य लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे’ असे भाकित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संपूर्ण देशातच बालकांच्या आरोग्याविषयीचे मंथन सुरू झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.