Pune Corona News : ‘जम्बो’मध्ये 91 वर्षीय आजोबांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई!

एमपीसीन्यूज : विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका 91 वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या संसर्गावर मात करीत या विषाणूवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असे या करोना योद्ध्याचे नाव आहे.

शेलार यांनी तब्बल 25  दिवस जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनाविरुद्ध झुंज दिली. त्यांना करोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यामुळे त्यांना जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांनी कोरोनावर विजय मिळवलाच आणि आज बुधवारी, 21 ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

हे आजोबा व्यवस्थित बरे होऊन घरी जात असल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह जम्बो सेंटरमधील कोरोना योद्ध्यांनीही आनंद व्यक्त केला.

यापूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या गंभीर अवस्थेतील 55 वर्षीय कोरोनाबाधित महिला पेशंटने तब्बल 31 दिवस कोरोनाविरुद्ध लढा देत कोरोनावर विजय मिळवला होता.

आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व कोरोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.