Pune Corona News : पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविडचे तब्बल 6223 बेड रिकामे !

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात कोविडचे तब्बल 6223 बेड रिकामे असून त्यामध्ये ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन बेडचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांसाठी एकेकाळी बेड मिळवण्यासाठी अक्षरश: धावपळ करावी लागत होती. त्यातून अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. सुदैवाने बाधितांची संख्या आता कमी झाल्याने बेड शिल्लक राहात असल्याची सकारात्मक बाब आकडेवारीतून समोर येत आहे. महापालिकेच्या ‘डॅशबोर्ड’साठी जमा करण्यात येणाऱ्या आकडेवारीतून 6223 बेड रिकामे असल्याची नोंद झाली आहे.

महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी सरकारी, महापालिका रुग्णालयांशिवाय खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेतले होते. शिवाय 80 टक्के बेड नियंत्रणाखाली ठेवले होते.

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने तसेच खासगी रुग्णालयांनी विनंती केल्यावरून महापालिकेने राखीव ठेवलेले बेड अन्य आजाराच्या रुग्णांसाठी देण्याला परवानगी दिली.

त्यामुळे ‘प्लॅन सर्जरी’ केलेल्या रुग्णांनाही हे बेड मिळत आहेत. मात्र, आपत्कालिन स्थिती पुन्हा उद्‌भवल्यास हे बेड पुन:श्‍च ताब्यात घेण्यात येतील, अशी अट रुग्णालयांना घालण्यात आली आहे.

या संदर्भात महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, जवळपास सगळ्याच रुग्णालयांमधील कोविडसाठी राखीव असलेल्या परंतु, रिकाम्या असलेल्या बेडची माहिती दररोज घेतली जाते. जी रुग्णालये ती माहिती देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र, यासाठी नेमलेल्या खास कर्मचाऱ्यांमार्फत ही माहिती दररोज अपडेट केली जाते आणि ती ‘डॅशबोर्ड’वर ‘डिस्प्ले’ केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.