Pune Corona News : होमआयसोलेशन बंदचा निर्णय अनाकलनीय :  जगदीश मुळीक 

एमपीसीन्यूज  :  राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले असून पुण्यासारख्या  मोठ्या शहरात कोरोना बाधित रूग्णांसाठी होमआयसोलेशन बंद करून कोविड सेंटरमध्येच दाखल करण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याची टीका भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

पुणे हे राज्यातील मोठे शहर आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत पुण्यातील रूग्ण संख्या  देशात मोठी होती. त्यापैकी मोठ्या संख्येने बाधित असणार्‍या रूग्णांनी आपआपल्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर मात केली. विलगीकरणाचे सर्व नियम पाळले. परंतु, आता सर्वच कोरोना रूग्णांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.

पुन्हा एकदा रूग्ण संख्या  वाढल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णांना कोविड सेंटरमध्ये सामावून घेणे शक्य होणार नाही. तशा प्रकारची व्यवस्थाही शहरामध्ये उपलब्ध नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात साधन-सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रूग्णांची हेळसांड होण्याची भीती वाटते. शिवाय कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यावर रूग्णांचा मानसिक ताण-तणाव आणि कुटुंबियांमध्ये भीती वाढण्याची शक्यता आहे. कोविड सेंटरच्या व्यवस्थापनासाठी शासन कोणतीही आर्थिक मदत करत नाही.

वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त करतात. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. असे असल्यास सौम्य लक्षणे असणार्‍या लहान मुलांची कोरोना सेंटरमध्ये व्यवस्था करणे गैरसोयीचे आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता व्यवस्थापनात मर्यादा येऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आपला निर्णय मागे घ्यावा; अन्यथा तीव्र  जनआंदोलन केले जाईल, असा इशारा मुळीक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.