Pune Corona News : विदारक परिस्थिती; बेड न मिळाल्याने 4 कोरोना बाधितांनी घरातच जीव सोडला

रेमडिसीव्हरबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच

एमपीसी न्यूज : पुण्यात बेड मिळत नसल्याने होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या 4 कोरोना बाधितांना घरातच जीव सोडावा लागलाय. एकीकडे बेड नाही म्हणून घरात जीव सोडावा लागतोय, तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड मिळून सुद्धा रेमडिसीव्हर मिळत नाही म्हणून रुग्ण गंभीर होतोय. रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनसाठी शेकडो किलोमीटर वणवण भटकटायेत. प्रशासन देखील परिस्थिती हाताळण्यात हतबल हतबल झाल्याचे पाह्यला मिळत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातला पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला होता. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली अन पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेची अक्षरशः लक्तरे निघालीत. पुण्यातील कोरोना रुग्ण, उपलब्ध बेड यावर नजर टाकली की आरोग्य यंत्रणेचं हे भयाण वास्तव दिसत आहे.

एकंदरीतच पुण्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असून, परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाच ते सहा हजार कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. सध्या तब्बल 50 हजार सक्रिय बाधित शहरात आहेत.

रेमडिसीव्हरबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच

रेमडिसीव्हर मिळत नसल्याने त्याचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे औषध रुग्णाला थेट हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होईल असे आदेश काढले. मात्र, हे आदेश कागदावरच आहेत. हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर गर्दी करतायेत. अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त लावून गर्दी हटवली जातीये.

शहरातील रेमडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 5 दिवस लागणार

दरम्यान, शहरातील रेमडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून किमान 5 दिवस लागणार आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत 5 हजार रेमडिसीव्हर पुण्यात येतील, त्यानंतर कोविड हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. एस. प्रतापवार यांनी दिलीये. राज्यात रेमडिसीव्हर निर्मिती करणारी एकच कंपनी आहे. त्यात रेमडिसीव्हर इंजेक्शनची एक बॅच तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. एका बॅचमध्ये 30 ते 35 हजार रेमडिसीव्हर इंजेक्शन तयार होतात.

एवढ्या विदारक परिस्थितीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आठवड्याला आढावा बैठक घेऊन आदेश देतायेत, पण हे आदेश फक्त कागदावरच राहत असल्याचं वास्तव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.