Pune Corona News : कोणी बेड देता का बेड? या कोरोनाबाधिताला;  बेडसाठी पालिकेला रोज 10 हजार फोन 

एमपीसीन्यूज  :   कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने  चोवीस तास हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या हेल्पलाईनवर दिवसाला तब्बल 9 ते 10 हजार फोन येत असून बेडची मागणी केली जात आहे.  

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून सक्रिय रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  अत्यवस्थ रुग्णांची संख्याही वाढली आहे.  ऑक्‍सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील करोनाबाधितांसाठीचे आरक्षित बेड भरत चालले आहेत. त्यामुळे खाटा मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाबाधितांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने ‘कोविड-19 वॉर रुम’ उभारले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान या ‘वॉर रुम’च्या माध्यमातून महापालिकेने अनेक रुग्णांना बेड मिळवून दिले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या हेल्पलाइनवरील कॉलची संख्या कमी म्हणजे दिवसाला सुमारे 20 इतकी झाली होती. मात्र, आता पुन्हा त्याचे प्रमाण वाढले आहे.

दिवसभरात तीन शिफ्टमध्ये या ‘वॉर रुम’चे काम चालते. मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी ‘वॉर रुम’च्या हेल्पलाइनवर सहा तासांच्या एका ‘शिफ्ट’ मध्ये सुमारे साडेचारशे कॉल यायचे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दिवसभरात तीस ते पन्नास कॉल यायचे, हे कॉल्स अगदी 20 पर्यंत गेले होते.

मात्र, आता दिवसभरातील कॉलची संख्या दोनशेच्यावर पोहोचली आहे. त्यामध्ये ऑक्‍सिजनयुक्त बेडच्या उपलब्धतेबाबत विचारणा करणारे कॉल सर्वाधिक आहेत. आता जम्बो रुग्णालय सुरू झाले आहे, तसेच विविध ठिकाणची कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयातील खाटाही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यास मदत मिळेल, असे मत ‘वॉर रुम’मधील डॉक्‍टरांचे म्हणणे  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.