Pune Corona News: पुण्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची – उपमुख्यमंत्री अजित पवार 

एमपीसी न्यूज – कोरोना विरुध्दच्या लढाईत  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ अभियानाला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना (कोविड-19) विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्य गट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” या अभियानाचा पवार यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी दक्षता नियमांचे पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेवून जावी लागणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

आपण यापूर्वीही घरी राहून, दक्षता घेत सण उत्सव साजरे केले आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून सण उत्सव घरीच साजरे  करूया, तसेच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करुया, असे सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे, कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.