Pune Corona News : शासकीय व खासगी रुग्णालयांना अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा

एमपीसीन्यूज : राज्यातील कोवीड रुग्णालयांमध्ये अपघात होऊन रुग्णांचा हकनाक बळी जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना अग्निशामक दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व रुग्णालयांनी पुन्हा एकदा फायर सेफ्टी ऑडीट करून घ्यावे, असे आदेश अग्निशामक दलाने दिले आहेत.

शहरात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने जवळपास सर्वच रुग्णालयात कोरोना रुग्ण आहेत. ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजार 500 च्या पुढे गेली आहे. तर गंभीर रुग्णांची संख्या 1 हजार 300 पेक्षा जास्त आहे. शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन साठा, अग्निशामक यंत्रणा याकडे लक्ष ठेवणे अनिवार्य झाले आहे.

पुणे शहरातील नायडू रुग्णालयामध्ये पहिले कोविड केअर सेंटर सुरू झाले. त्यानंतर तेव्हा अग्निशामक दलाने दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या. खासगी, शासकीय रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेची पाहणी केली. तेथील अग्निप्रतिरोधक यंत्रणेसंदर्भातील सर्वेक्षण करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला.

ऑडिट करताना त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात संबंधित कोविड रुग्णालयांना अग्निशामक दलाने पत्रही दिले आहे. त्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना देखील सादर करण्यात आला आहे.

नाशिक आणि विरार येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.