Pune Corona News : रेमडेसिवीरबाबत कडक धोरण राबवा, लसीकरणाला गती द्या; अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसीन्यूज : पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असले तरी देखील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, रेमडेसिवीर बाबत कडक धोरण राबवा, लसीकरणाला गती द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनयुक्त बेडचा वापर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यावर भर द्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

कोरोना नियंत्रणासाठी तसेच वैद्यकीय सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी डॉक्टरांबरोबरच सर्व अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याबद्दल सर्वांच्या कामाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा- सुविधांमध्ये वाढ करा. वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा.

शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, तसेच कोरोना लसीकरणाला गती देण्याची सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.