Pune Corona News : पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी !

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा दिल्लीला बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पुण्या-मुंबईतही दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात होती. परंतु, पुण्यात दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची आकडेवारी स्थिर असल्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असून जरी आली तरी ती सौम्य स्वरुपात असेल, अशी शक्यता आरोग्य प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर पुण्यातील सार्वजनिक सेवा, उद्योगधंदे, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आले. परंतु, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडवत गर्दी होत असल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता होती.

विशेषत: दिवाळी सणांमध्ये बाजारपेठामध्ये तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे ही संख्या वाढत दुसरी लाटसदृश परिस्थिती होईल असे भाकित आरोग्य तज्ञांकडून केले जात होते. परंतु, प्रतिदिन रुग्ण संख्या ही 350 ते 450 च्या दरम्यान राहत आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान दिल्लीमध्ये दुसऱ्या लाट आल्यामुळे लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच अमेरिकेसह युरोप खंडातील देशांमध्ये दुसऱ्यांना संपूर्ण लॉकडाऊन केला गेला आहे. तसेच दुसऱ्या लाटेत मृत्यूदर देखील वाढल्यामुळे मोठी जीवितहानी होत आहे.

त्या पार्श्वभुमीवर पुण्यात दुसरी लाट येऊ शकते का या प्रश्नावर मत व्यक्त करताना पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ.आशिष भारती म्हणाले, पुणे शहर जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्ण संख्या स्थिर आहे. पॉजिटिव्ह रुग्णसंख्येचा वेगही मंदावला आहे. स्थिर आकडेवारी राहात असल्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.

सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे म्हणाले, पुण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही. परंतु, आलीच ती सौम्य स्वरुपात दिसून येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.