Pune Corona News : नॉन कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून द्या : खासगी रुग्णालयांची महापालिकेकडे मागणी

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या जम्बोसह सर्व कोविड केयर सेंटरमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांसाठी बेड आरक्षित ठेवले आहेत. परंतु कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने शेकडो बेड रिक्त आहेत. त्यामुळे हे बेड नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी खासगी रुग्णालयांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागणीला महापालिकेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सध्या शहरातील कोविड ॲक्टिव्ह आणि गंभीर रुग्णांची संख्या घटत आहे. परिणामी जम्बोसह शहराच्या सर्व 15 क्षेत्रिय कार्यालयातील कोविड केयर सेंटरमध्ये बेड रिकामे राहात आहेत. परंतु या सेंटरमध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, अस्थमा, फुफुस्सांचे जुने आजार असलेल्या रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी खासगी रुग्णालयांमधील राखीव जागांवर ताण वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील आरक्षित बेड अन्य रुग्णांना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन या मागणीवर गांभिर्यपूर्वक विचार करत आहे. परंतु भविष्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर हे बेड पुन्हा देण्याची लेखी हमी द्यावी लागणार आहे. तरच कोविड 19 साठी आरक्षित ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन बेड नॉन कोविड रुग्णांना देण्यास परवानगी दिली जाणार आहे.

शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जरी घटलेली असली तरी गंभीर रुग्णांची संख्या साडे सातशेच्या घरात आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील आयसीयू व्हेंटीलेटर बेड मात्र अन्य रुग्णांना देता येणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.