Pune Corona News : धक्कादायक ! उपचारासाठी बेड न मिळाल्याने 51 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा घरातच मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था किती ढासळली आहे याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. औंध येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे त्याचा घरातच मृत्यू झाला. औंधमधील आंबेडकर वसाहतीमध्ये ही घटना घडली. संतोष ठोसर (वय 51) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

संतोष ठोसर हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून ते रुग्णालयात बेड मिळवण्याच्या शोधात होते. महापालिकेच्या वेगवेगळ्या हेल्पलाईनवर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व नंबर सतत व्यस्त होते. परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही.

दरम्यान त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न केले. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तेथे दाखल करून घेतले नाही. त्यानंतर कुटुंबियांनी औंध बोपोडी बाणेर परिसरातील रुग्णालयातही बेड बाबत चौकशी केली. परंतु तेथेही त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर वेळीच उपचार न मिळाल्यामुळे संतोष ठोसर यांचे घरातच निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूड आणि सहकारनगर बेड अभावी दोघांचा मृत्यू

पुण्यातील कोथरूड आणि सहकारनगर परिसरात देखील अशाच घटना उघडकीस आल्या आहेत. कोथरूड परिसरात कोरोना चाचणी करून घरात क्वारंटाईन झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सहकारनगरमध्येही घरामध्येच कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, रुग्णांना वेळीच बेड उपलब्ध होत नसल्याने आणि महानगरपालिकेच्या हेल्पलाईनद्वारे वेळीच मदत मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.