Pune Corona News : लहान मुलांसाठी आता विशेष टास्क फोर्स : महापौर मुरलीधर मोहोळ

टास्क फोर्स उपचारांची दिशा आणि उपाय योजना सुचवणार

एमपीसीन्यूज : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत. याचाच एक भाग म्हणून लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील बालरोग तज्ञांची महत्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यात तज्ञांची सर्वांगीण मते जाणून घेत महापौर मोहोळ यांनी लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

बैठकीत 53 बालरोग तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी महापौर कार्यालयातून उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह नगसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

 महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुण्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र असे सकारात्मक चित्र असले, तरी कोणतीही गाफीलताआपण ठेवणार नाहीत. तसेच देशभरात तिसऱ्याला लाटेसंदर्भात तज्ञांची विविध मते समोर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच आपण लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि लहान मुलांमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष भर देत आहोत.

याचा पहिला टप्पा म्हणजे पुणे महानगरपालिका येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात अद्ययावत सुविधांचे चाईल्ड कोविड केअर रुग्णालय सुरू करत आहे. तसेच दुर्दैवाने लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आपली पूर्णपणे तयारी असावी. या दृष्टिकोनातून टास्क फोर्स विशेष जबाबदारी भूमिका निभावणार आहे.

बालरोग तज्ञ डॉ. संजय नातू म्हणाले, ‘तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे, सोबतच कुशल वैद्यकीय मनुष्यबळहीआवश्यक आहे. शिवाय यासाठी विविध उपकरणे याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या बाबतीत लवकर निदान झाले, तर उपचार योग्य दिशेने करणे शक्य आहे. लहान मुलांना मोठ्या व्यक्तींकडूनच संसर्गाचा धोका असू शकेल, त्याबाबत काळजी घ्यावी लागेल. आमची संघटना यासाठी कायमच पुणे महापालिकेला मदत करणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.