Pune Corona News : बेड्सची संख्या लवकरच वाढणार

 महापौर, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांची बैठक;तातडीने कार्यवाही करण्याच्या महापौरांच्या सूचना

एमपीसीन्यूज : कोरोना संसर्गात शहरात बेड्सची गरज लक्षात घेत नियोजन करण्यात आले असून सीसीसी बेड्ससोबतच शहरात ऑक्सिजन बेड्स वाढवण्यासंदर्भात एक्शन प्लॅन तयार केला जात आहेत. या प्लॅनअंतर्गत सीसीसीमध्येही जवळपास 10 टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत.

बेड्स तातडीने वाढवण्यासंदर्भात महापौर मोहोळ, विभागीय आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शहरातील कोरोना रुग्णांकरता बेड्सची संख्या शीघ्रतेने वाढविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व त्यांची दखल घेऊन जलद गतीने कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, नित्य श्रद्धा हॉस्पिटलला कोविड उपचारासाठी समाविष्ट करण्यात येणार असून संबंधित हॉस्पिटल प्रशासन राजी असल्यास त्यांना निर्धारित रक्कम देण्यात येणार असून संबंधित हॉस्पिटल सोबत सामंजस्य करार करून चालविण्यासाठी देण्याकरिता तत्वतः ठरवण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरातील इतर खाजगी रुग्णालये कोविड उपचारासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने शोधून त्यांचाही या प्रक्रियेत समावेश करण्याच्या सूचना केल्या.

_MPC_DIR_MPU_II

‘COEP हॉस्टेल अथवा ॲग्रीकल्चर कॉलेज हॉस्टेल आणि उर्वरित कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करून त्या ठिकाणी 10 % ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये देखील क्षमतेनुसार 10% ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर संपर्क करून संबंधित हॉटेल्समध्ये सी.सी.सी (कोविड केअर सेंटर) सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

‘महानगरपालिकेच्या वापरात नसलेल्या इमारती जसे की, हॉस्पिटल, शाळा अथवा इतर इमारती, अशा ठिकाणी ऑक्सिजन बेडची उपलब्धता करता येईल का यासाठी माहिती अहवाल मागविण्यात आला आहे.

लायगुडे व बोपोडी हॉस्पिटलमध्ये 20 ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात येणार असून तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कोविड उपचारासाठी अद्याप अधिग्रहित न केलेल्या हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांच्या समवेत MoU (सामंजस्य करार) करून तेथील बेड्स अधिग्रहित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

 दोन दिवसांत आणखी २०० विशेष बेड्स !

शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये येत्या दोन दिवसांत १०० बेड्स उपलब्ध केले जाणार असून तेथील उपलब्ध बेड्सची क्षमता ६०० पर्यंत वाढणार आहे. दळवी हॉस्पिटलमध्ये सध्या १०० बेड्स उपलब्ध असून येत्या दोन दिवसांत ही संख्या दुप्पट होणार असून आता तेथे २०० बेड्स उपलब्ध होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.