Pune Corona News : पुण्यातील स्थिती गंभीर; गेल्यावर्षीसारखा लॉकडाऊन लावा : मुंबई उच्च न्यायालय

एमपीसीन्यूज : पुण्यातील स्थिती गंभीर आहे. त्यामुळे पुणे शहरासह जेथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. तसेच याबाबत आम्हाला आदेश द्यायला लावू नका, असेही न्यायालयाने या वेळी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालय राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत आहे. या संदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही सूचना केली. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असे मत न्यायालयाने नोंदवले.

पुण्यात सक्रिय रुग्णसंख्या 1.4 लाख आहे. राज्यात आतापर्यंत पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात रुग्ण उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्यावर पुण्यातील रुग्ण संख्या चिंताजनक असल्याचे न्यायालयाने म्हटले.

मुंबई मॉडेलचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केले असेल तर पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांच्यासह इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारले पाहिजे, असा सल्लाही मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

दरम्यान, ‘तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत’ ? अशी विचारणा न्यायालयाने पुणे पालिकेच्या वकिलांना केली. ‘तुमच्याकडे सक्रिय रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील, पण काहीतरी केले पाहिजे’, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.