Pune Corona News : ‘जम्बो’मधील 300ऑक्सिजन बेड केले कमी; रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय

एमपीसीन्यूज : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधील 300 ऑक्सिजन बेड कमी करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची‌ संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने आणि ऑक्सिजन बेडची मागणीही कमी झाल्याने बेड कमी केल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या सुद्धा वाढली होती. खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुस्किल झाले होते.

या पार्श्वभूमिवर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासन आणि महापालिका यांच्यावतीने शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आले होते.

सुरूवातीला काही‌ दिवस गोंधळाचे गेल्यानंतर हे सेंटर रुग्णांंसाठी वरदान ठरले. शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी जम्बो कोवीड सेंटर बंद करण्यात आले. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या‌लाटेत शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने 22  मार्चपासून पुन्हा जम्बो कोवीड सेंटर सुरू करण्यात आले. जसजसे रुग्ण वाढतील‌ तसतसे जम्बोतील बेडची संख्या वाढवून ती 700 वर नेण्यात आली होती.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेटही साडेसात टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने ऑक्सिजनवरील रूग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. परिणामी ऑक्सिजन बेडची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या जम्बो कोवीड सेंटरमधील ३०० ऑक्सिजन बेड कमी करण्यात आले आहेत.

त्यामुळे आता सेंटरमध्ये 200  बेड ऑक्सिजनचे कार्यान्वीत आहेत. यासोबतच एचडीयुचे 140  आणि आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या 60 बेड कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.