Pune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ

उपचारासाठी योजनेची मर्यादा आता 3 लाखांपर्यंत; शहरातील 140 दवाखान्यात योजना उपलब्ध

उपचारांसाठी दळवी हॉस्पिटलयेथील 15 बेड्स राखीव

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर  आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे.

आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र, आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा 1 लाखांवरुन 3 लाख रुपयांपर्यंत वाढण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांसंख्येचा विचार करता महापौर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत महत्वाची बैठक घेऊन उपचारांसंदर्भात निर्णय घेतले.

याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयात 15  बेड हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रूग्णालयात तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

‘पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन सज्जही ठेवण्यात येत आहे. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे.

कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिस बाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे’, असेही महापौर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.