Pune : प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आढळले कोरोना रुग्ण ; नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग पाळण्याची गरज

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण नसलेल्या भागांत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. सिंहगड रोड, कोथरूड – बावधन, वारजे – कर्वेनगर, औंध – बाणेर या क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत 4 ते 5 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

वारजेत शुक्रवारी कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर या भागातील 54 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, त्यांचे स्वाब टेस्ट अजूनही झाले नाही. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेले कोरोनाचे संकट आता जनता वसाहत झोपडप्पाट्टीतही घुसले आहे. शहराच्या झोपडपट्ट्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना ते आता इतर झोपडपट्ट्यातही घुसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत 600, ढोले – पाटील रोड 488, येरवडा – कळस धानोरी 371, शिवजीनगर – घुलेरोड 335, कसबा – विश्रामबागवाडा 282, धनकवडी – सहकारनगर 231, बिबवेवाडी 153, वानवडी – रामटेकडी 142, कोंढवा – येवलेवाडी 47, हडपसर – मुंढवा 78, नगररोड – वडगावशेरी 89, सिंहगड रोड 23, वारजे – कर्वेनगर 17, कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालय परिसरात 10 कोरोनाचे रुग्ण आहेत.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन हजारांवर गेली आहे. तर, कोरोनाच्या रोज 1500 ते 1600 चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रोज 200 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.