Pune : करोना : पुण्यात ‘त्या’ दोन प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे सुरुच; मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह!

एमपीसी न्यूज – दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी ‘करोना’बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युध्द पातळीवर सुरु आहे. या रुग्णां सोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासी देखील आज ‘करोना’ बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ‘सात’ झाली आहे.

११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११९५ विमानांमधील १,३८,९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सर्कारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे.

यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशात आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ६३५ प्रवासी आले आहेत.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ३१२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आजवर भरती झालेल्या ३४९ प्रवाशांपैकी ३१२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १८ जण पुणे येथे तर १५ जण मुंबईत भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीक्रण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते.

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६३५ प्रवाशांपैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली,नां देड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर,जळगाव,चंद्रपूर सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.