Pune : कोरोनामुळे मुळा – मुठा नदीचे पाणी झाले शुद्ध ; विविध नमुन्यात बाब आली समोर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील प्रदूषणाची पातळी नेमकी किती कमी झाली आहे, हे समजण्यासाठी महापालिकेतर्फे लॉकडाऊनपूर्वी मार्च 2020 महिन्यात प्रदूषणाच्या काही घटकांची पातळी मोजण्यात आली. त्यामध्ये विविध नमुने घेण्यात आले. मुळा – मुठा नदीतील पाण्याचे विश्लेषण करण्यात आले. व्यावसायिक आणि औद्योगिक कारभार ठप्प झाल्याने नदीच्या पाण्यावर किती परिणाम झाला, यासाठी नमुने घेण्यात आले. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी), पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन (Dissolved Oxygen) या 3 घटकांचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये मुळा – मुठा नदीचे पाणी शुद्ध झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा पुणे शहरातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असला तरी पर्यावरणावर मात्र सकारात्मक परिणाम झाला आहे. पाण्यातील जैविक पदार्थांच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून बीओडीचा वापर केला जातो.

अशुद्ध पाण्यातील जैविक पदार्थांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्मजंतूंना किती मिलिग्रॅम ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यावरून त्या पाण्यातील बीओडीचे प्रमाण मोजले जाते. बीओडीचे प्रमाण जेवढे कमी तेवढे ते पाणी चांगल्या गुणवत्तेचे मानले जाते.

बीओडीचे प्रमाण 61.61 मिलिमीटर ग्रॅम वरून 32.9 मिलिमीटर ग्रॅम पर्यंत कमी झाले आहे. सरासरी बीओडी अंदाजे 50 टक्के कमी झाल्याचे दिसून आले. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, खाजगी कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंटस, शाळा, कॉलेज, आदी पासून तयार होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही घट दिसून येत आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या (30 mg/l) मानाकाच्या जवळपास बीओडीची पातळी कमी झाली आहे. पाण्यातील सीओडीचे प्रमाण जेवढे कमी तेवढी पाण्याची गुणवत्ता अधिक चांगली असते. सीओडीचे प्रमाण 159.68 मिलिमीटर ग्रॅम वरून 67.7 मिलिमीटर ग्रॅम पर्यंत कमी झाले आहे. सरासरी सीओडी अंदाजे 42 टक्के कमी झाली आहे.

डिओचे एकक मिलिमीटर ग्रॅम असे आहे. विरघळलेला ऑक्सिजन कमी झाला तर जलसृष्टीची वाढीची क्षमता कमी होते. डीओ ची पातळी 3.19 मिलिमीटर ग्रॅम वरून 4.6 मिलीमीटर ग्रॅम वाढले होते.

स्वारगेट सारख्या अति वर्दळीच्या चौकातील ध्वनीची पातळी 91dB पासून कमी होऊन 67dB पर्यंत खाली आल्याने या ठिकाणी मोठा फरक जाणवला. तर, वाहनांची वर्दळ कमी झाल्याने ध्वनी प्रदूषणही कमी झाले आहे. एप्रिल 2020 मधील लॉकडाऊनच्या कालावधीतील प्रदूषणाची तुलना एप्रिल 2019 महिन्याशी करण्यात आली.

रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने त्याचा परिणाम NO2 या घटकाच्या हवेतील प्रमाणात दिसून आला. मागील वर्षीपेक्षा NO2 चे प्रमाण 67 टक्के कमी झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.