Pune : कोरोना : सरदार पटेल रुग्‍णालयाला सव्‍वा दोन कोटी -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

एमपीसी न्यूज – जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने अनेक उपाययोजनांद्वारे त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. छावणी मंडळाच्‍या (पुणे कॅण्‍टोन्मेंट बोर्ड) सरदार वल्‍लभभाई पटेल रुग्‍णालयासाठी विशेष बाब म्‍हणून 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारणीसाठी उपलब्‍ध करुन दिला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्‍ह्यातील शासकीय रुग्‍णालयांप्रमाणेच खासगी रुग्‍णालयांचीही या कोरोनाशी लढण्यासाठी मदत घेतली आहे. याचाच एक भाग म्‍हणून पुणे कॅण्‍टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्‍लभभाई पटेल रुग्‍णालयाचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी उपचारांची सुविधा उपलब्‍ध आहे. याच धर्तीवर छावणी परिसरातील नागरिकांना कोरोनाचा त्रास झाल्‍यास तातडीने उपचार त्‍या भागातच उपलब्‍ध व्‍हावेत, यासाठी सरदार पटेल रुग्णालयाला त्‍यांची यंत्रणा सज्ज ठेवण्‍यास सांगण्‍यात आले.

लष्कर परिसरात एखाद्या व्‍यक्‍तीला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्‍या व्‍यक्‍तीला विलग करण्यासाठी 50 खाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. गरज भासल्यास या कक्षाची क्षमता 100 ते 120 खाटांपर्यत वाढविण्यात येणार आहे.

मात्र, कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याची गरज होती. त्यानुसार जिल्‍हाधिकारी राम यांनी मंडळाकडून प्रस्‍ताव मागवून घेतला आणि या प्रस्‍तावास प्राधान्‍याने मान्‍यता घेतली. राज्‍य सरकारकडून प्राप्‍त झालेला निधी मंडळाकडे वर्ग करण्‍यात आला आहे.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनीही सरदार पटेल रुग्णालयाच्‍या प्रस्‍तावासाठी पाठपुरावा केला. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर कुलजित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनीही लष्‍कर परिसरात आरोग्‍य व स्‍वच्‍छतेबाबत तसेच कोरोनाविषयक जनजागृतीसाठी आवश्‍यक ते उपाय योजण्‍याचे निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.