Pune Corona Update : 1431 रुग्ण कोरोनामुक्त, 40 जणांचा मृत्यू, 1336 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. बुधवारी (दि. 30 सप्टेंबर) तब्बल 1431 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आजही कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून हे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत 1 लाख 25 हजार 260 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 6 हजार 256 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1336 नवे रुग्ण आढळले. 40 जणांचा मृत्यू झाला. 932 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 516 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 45 हजार 291 रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 486 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 545 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा साठा हॉस्पिटलमध्ये पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाहेरून चढ्या दराने घ्यावे लागत आहे.

तर, पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य शासनाकडे 250 व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटलमध्ये 800 बेडसचे नियोजन करण्यात आले आहे.

औंध – बाणेर येथेही 314 बेडसचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर लागणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेला पीएम केअर फंडातून 250 व्हेंटिलेटर द्यावे, अशी मागणी आयुक्तांनी राज्य शासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे. कोरोना कमी झाल्यावर हे व्हेंटिलेटर शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. त्या संबंधीचे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.