Pune Corona Update : 1883 रुग्ण कोरोनामुक्त, 2120 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) 1883 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 3 हजार 978 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज 7 हजार 162 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2120 नवे रुग्ण आढळले. 43 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 936 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 480 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 24 हजार 568 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 918 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 672 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) पथके स्थापन करण्यात आली आहेत.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा, दुकाने, मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन काळात टप्पेनिहाय सुरू करण्यात आलेले आहे.

दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वेळोवेळी बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावर अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण 3 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.