_MPC_DIR_MPU_III

Pune Corona Update : कौतुकास्पद ! जंबो कोविड सेंटरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी 40बेड राखीव

कोविड निदान ते निवारण, तपासणी ते करोनामुक्तीपर्यंतची तत्पर सेवा सुरू

एमपीसी न्यूज : कुष्ठरोगाने ग्रासलेल्या व्यक्तींना करोना विषाणूचा संसर्ग झाला तर उपचार कोठे व कोण करायचे अशा समस्येला सामोरे जावे लागत होते. परंतु पुणे महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेत जंबो कोविड केयर सेंटरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी 40 बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 21 कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार देखील सुरू केल्याची माहिती महापालिकेच्या अतिरक्त आयुक्त व जंबो कोविड सेंटरच्या प्रमुख रूबल अग्रवाल यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

बंडोरावाला कुष्ठरोग निवारण केंद्रातील चार करोनाबाधित व्यक्तींची तपासणी करायची होती. त्यासाठी चार दिवसांपूर्वी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी गेले होते. मात्र नेहमीप्रमाणे त्यांची तपासणी करणे शक्य नव्हते. कारण कुष्ठरोगामुळे त्यांची बोटे, कानाची पाळी वगैरे अवयव झडलेले होते. त्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी तपासणेही कठीण होते. तसेच एक्स रे, रक्त तपासणी अशा चाचण्या त्यांच्या संस्थेत केल्या जात नाहीत. त्यांना महापालिकेच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून एका मोठ्या रुग्णालयात पाठवले, मात्र काही रुग्णांकडे आधार कार्ड वगैरे लगेच उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेतले नाही. गुरूवारी रात्री 11 वाजता ते सर्व करोनाबाधित हताश होऊन कुष्ठरोग केंद्रात परतले, ही व्यथा कोंढवा कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. दीप्ती बच्छाव यांनी रात्रीच मेसेज करून अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांना कळविली.

“या प्रकाराची गंभीर दखल घेत कुष्ठरोगी व्यक्तींबद्दल संवेदनशीलता दाखवित त्यांना ताबडतोब जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्याचे आदेश अति.आयुक्त अग्रवाल यांनी दिले,” अशी माहिती जंबो सेंटरचे वैद्यकीय प्रमुख डॉ. श्रेयांश कपाले यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील त्या चार करोनाबाधितांच्या संपर्कातील व बंडोरावाला केंद्रातील सर्व कुष्ठरोग्यांची तपासणी महापालिकेच्या वतीने करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तानाजी नारळे यांनी पुढील कार्यवाही करून तेथील 128 कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींची तपासणी केली. त्यामध्ये एकूण 21 व्यक्ती करोनाबाधित रुग्णांना जंबो सेंटरमध्ये दाखल केले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी देखील महापालिका प्रशासन व जम्बो सेंटरने कुष्ठरोग्यांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व तत्परता कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.