Pune Corona Update: सोमवारच्या 399 या संख्येत मागील तीन दिवसांतील शिल्लक रुग्णांचाही समावेश – महापौर

Pune Corona Update: Count of 399 corona patients was for the last three days, mayor's explanation

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेकडून सोमवार दिनांक 25 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या दैनंदिन अहवालात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या 399 इतकी दाखविण्यात आली आणि पुण्यात भीतीचे वातावरण पसरले. वास्तविक पाहता ती एका दिवसातील आकडेवारी नसून मागील तीन दिवसांतील प्रलंबित रिपोर्टचाही आकडाही त्यात समाविष्ट असल्याचे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. 

कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा दैनंदिन अहवाल पुणे महापालिकेकडून दररोज प्रसिद्ध केला जातो. त्यात नव्याने दाखल झालेले पॉझिटिव्ह रुग्ण, चिंताजनक प्रकृती असणारे रुग्ण, बरे झालेले रुग्ण आणि कोरोनाबाधित मृतांची संख्या अशी सर्व आकडेवारी असते. शहरामध्ये दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 200 च्या आसपास होती. ही संख्या सुद्धा काळजी वाढविणारीच. त्यातच सोमवारी एकदम दुप्पट वाढ दिसली आणि पुणेकरांच्या काळजात धस्स झाले.

कोरोना आजाराचा संसर्ग दुप्पट, चौपट पद्धतीने वाढतो. अशा कम्युनिटी ट्रान्समिशनची पुण्यातील ही सुरुवात तर नाही ना, अशा शंकेने पुणेकर चांगलेच धास्तावले होते.

महपौर मुरलीधर मोहोळ यांनी या शंकेचे निराकरण करुन पुणेकरांना दिलासा दिला आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 25 मे रोजी अहवालात आलेल्या 399 या संख्येत 22, 23 व 24 मे रोजीच्या शिल्लक सँपलचा समावेश होता, असे स्पष्टीकरण मोहोळ यांनी केले आहे.

महापालिकेने घेतलेले संशयित रुग्णांचे सँपल तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविले जातात. मात्र, या संस्थेकडेही क्षमतेपेक्षा अधिकचे काम सुरू असल्याने सँपलचे निदान होण्यास काहीसा वेळ लागत आहे. त्यामुळे 399 ही संख्या एकूण चार दिवसांतील रुग्णांची होती. स्वाभाविकच ती अधिक दिसली आणि पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली.

सध्या एका दिवसात नवीन रुग्णांची संख्या सरासरी पावणे दोनशे ते दोनशे एवढी आहे. ही संख्या आणखी कमी झाली तर पुणेकरांना आनंदच वाटेल, मात्र तूर्त महापौरांनी केलेल्या खुलाशामुळे पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.