Pune Corona Update: Good News! पिंपरीत 55 टक्के तर पुण्यात 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

Pune Corona Update: Good News! 55% of patients in Pimpri and 50% of patients in Pune overcome corona

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – देश व राज्याच्या तुलनेत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा मृत्यूदर जास्त असला तरी या दोन्ही शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देश व राज्याच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत 49.75 म्हणजे जवळजवळ 50 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर पिंपरी-चिंचवडमध्ये 55.24 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही फार मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणावी लागेल. 

पुणे शहरात आतापर्यंत एकूण 2 हजार 987 कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 49.75 टक्के म्हणजेच जवळजवळ 50 टक्के आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत एकूण 210 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 116 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण 55.24 टक्के आहे. जगात आतापर्यंत 37.7 टक्के, देशात 34.11 टक्के तर राज्यात 22.02 टक्के कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्या सर्वांपेक्षा पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कोरोनामुक्तांचे प्रमाण खूप चांगले आहे, असे म्हणता येईल.

जगात आतापर्यंत तीन लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जगतिक कोरोना मृत्यूदर सध्या 6.70 टक्के आहे. भारतात 2,649 कोरोनाबळी गेले आहेत. देशातील कोरोना मृत्यूदर 3.23 इतका आहे. महाराष्ट्रात 1019 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर देशाच्या मृत्यूदरापेक्षा थोडा अधिक म्हणजे 3.70 टक्के इतका आहे.

कोरोना मृत्यूदर मात्र काहीसा चिंताजनक

पुण्यात 169 कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर 5.66 टक्के आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडचा कोरोना पुण्यापेक्षा थोडा जास्त मृत्यूदर 5.71 टक्के इतका आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडचा कोरोना मृत्यूदर देश व राज्याच्या तुलनेत जास्त असला तरी जागतिक कोरोना मृत्यूदरापेक्षा या दोन्ही शहरांतील कोरोना मृत्यूदर कमी आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.  सुरूवातीच्या काळात पुण्यातील मृत्यू दर 10 टक्क्यांपेक्षाही अधिक होता. तो आता बऱ्यापैकी कमी झाला असला तर आणखी कमी होण्याची आवश्यकता आहे.

सक्रिय रुग्णांची घटती टक्केवारी आशादायक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घटत चाललेली सक्रिय रुग्णांची टक्केवारी आशादायक आहे. पुणे शहरात आता 1332 म्हणजेच 44.59 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये तर आता 60 म्हणजेच 28.57 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

राज्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 74.28 टक्के आहे. हे प्रमाण कमी होण्यासाठी कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढण्याची नीतांत गरज आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 62.66 टक्के आहे तर जगतिक पातळीवर हे प्रमाण 55.6 टक्के इतके आहे. म्हणजेच जग, देश आणि राज्य यांच्या तुलनेत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सक्रिय कोरोना रुग्णांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली आहे.

कोरोनाला घाबरू नका, पण काळजी मात्र नक्की घ्या!

कोरोनाबाधित रुग्णांची व मृतांचे दिवसेंदिवस वाढणारे हजारो, लाखोंमधील आकडे पाहून लोकांच्या मनात कोरोनाची विलक्षण दहशत निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात कोरोना हा झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्यावर मात करता येते, हे आता अडीच-तीन महिन्यांच्या अनुभवातून व तुलनात्मक आकडेवारीवरून सिद्ध झाले.

त्यामुळे कोरोना हा एवढे घाबरून जाण्यासारखा आजार नाही. कोरोना बरोबर देखील आपण सामान्य जीवन जगू शकतो, असा विश्वास हळूहळू लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. कोरोनाला घाबरू नका पण स्वतःची, परिवाराची व इतरांची काळजी मात्र नक्की घ्या! निम्मी लढाई जिंकली असली तरी अजून निम्मी लढाई बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.