Pune Corona Update: गुड न्यूज! पुणे शहराचा कोरोना रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर!

पुणे शहरातील 87 हजार 317 कोरोनाबाधितांपैकी तब्बल 70 हजार 269 रुग्ण कोरोनामुक्त! सक्रिय रुग्णांचे प्रमाण 17.11 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी एक चांगली व मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पुणे शहरातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. शहरातील 87 हजार 317 कोरोनाबाधितांपैकी तब्बल 70 हजार 269 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 80.48 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत 4 लाख 20 हजार 458 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. हे प्रमाणही देश आणि राज्यातील चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे.  दर दहा लाख लोकसंख्येमागे 94 हजार 935 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 20.77 टक्के आहे.

शहरात एकूण 87 हजार 317 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी तब्बल 70 हजार 269 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 हजार 108 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण 2.41 टक्के आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात सध्या 14 हजार 940  सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता 17.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.  सक्रिय रुग्णांपैकी 7 हजार 946 रुग्ण घरीच राहून होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत तर उर्वरित 6 हजार 994 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात 812 कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. हे प्रमाण 5.44 टक्के आहे. सध्या 492 कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून 320 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शहरातील कोरोना रुग्ण दुपटीकरणाचा वेग 40.11 दिवस इतका आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच मृत्यूदरही 2.41 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तथापि स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.