Pune Corona Update: मास्क वापरा, नाही तर… 500 रुपये दंड! – महापालिका आयुक्त

Pune Corona Update: Mask is mandatory, otherwise a fine of Rs 500 - Municipal Commissioner

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. दंड न भरल्यास कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत शहरात मास्क वापरणे बंधनकारक आहे. या आदेशाची बुधवार (दि. 24 जून) पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  घराबाहेर निघताना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी, सरकारी आणि खाजगी कार्यालयात संचार करताना प्रत्येक नागरिकाला मास्क घालणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे उदभवणारा संसर्गजन्य आजार ही शासनाने आपत्ती म्हणून घोषित केली आहे.

कोविड – 19 आजाराचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे विविधता उपाययोजना करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे प्रकरण 10, कलम 51 (ब) नुसार केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले निर्देश न पाळल्यास गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कार्यरत सर्व प्रमुख, उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक आणि आरोग्य निरिक्षकांना कारवाईचे अधिकार आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता मास्क घालणे आवश्यक आहे. अन्यथा 500 रुपये दंड भरावा लागेल किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा आयुक्तांनी आदेशात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.