Pune Corona Update: जिल्ह्यातील मृत्यूदर 9.15 टक्क्यांवरून 2.98 टक्क्यांपर्यंत खाली

Pune Corona Update: Mortality rate in the district drops from 9.15 percent to 2.98 percent. पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 61.64 टक्क्यांवर!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात काल (सोमवारी) एकूण 1245 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30 हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी मृत्यूदर 9.15 टक्क्यांवरून 2.98 टक्क्यांपर्यंत कमी झाला असून कोरोनामुक्तांचे प्रमाण 61.64 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 70 हजार 364 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 29 हजार 844 चाचण्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 17.52 टक्के आहे.

पुणे जिल्ह्यात काल (सोमवारी) 1,066  बऱ्या झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 18 हजार 395 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 61.64 टक्के आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 890 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर आता 2.98 टक्के इतका खाली आला आहे. 30 मार्चला पुण्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तेव्हा हा मृत्यूदर 2.33 टक्के होता. त्यानंतर तो हळूहळू वाढत 15 एप्रिलला 9.15 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला होता. त्यामुळे शहरात अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर कोरोना चाचण्यांची तसेच कोरोनाबाधितांची व कोरोनामुक्तांची संख्या वाढत गेली. तुलनेत मृतांचे प्रमाण मर्यादित राहिले. त्यामुळे टप्प्याने जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर घसरत आता 2.98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ट्वीट करून यासंदर्भातील आकडेवारी आणि आलेख प्रसिद्ध केला आहे. ही आकडेवारी आणि आलेख कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा आहे.

पुणे जिल्ह्यात आता 10 हजार 559 सक्रिय कोरोना उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता 35.38 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.