एमपीसी न्यूज – पुणे शहरात निर्माण झालेल्या बेड्सच्या प्रश्नावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीची बैठक घेत उपलब्ध बेड्स आणि नजीकच्या काळातील आवश्यक असणाऱ्या बेड्सच्या संख्येचा आढावा घेत ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या असून कमी कालावधीतच बेड्स प्रश्न सुटणार आहे.
बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, विभागीय आयुक्त विशेष अधिकारी सौरव राव, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतानु गोयल, नगरसेवक दीपक पोटे, अजय खेडेकर, सुशील मेंगडे, आनंद रिठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ससूनमध्ये साधारण नवीन 630 बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेड तयार केले जाणार आहेत. तसेच महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल, बोपोडी हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटलमध्ये ज्युपीटर, संचेती हॉस्पिटलमध्ये नवीन 125 आयसीयू बेड्स आणि 100 ऑक्सिजन बेड्स लवकरच उपलब्ध केले जाणार आहेत.
तसेच PMRDA च्या माध्यमातून बालेवाडी येथे 800 बेड्स नव्याने उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात 200 आयसीयू आणि 600 ऑक्सिजन बेड्सचा समावेश असेल. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्यसरकार यांच्या माध्यमातून  पुढील काहीच दिवसात उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच पुणे महापालिकेच्या माध्यमातून 3 ऑगस्टपर्यंत 600 ऑक्सिजन बेड्स तयार केले जात आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये 10% बेड्स ऑक्सिजनचे केले जाणार आहेत. येत्या 2 दिवसात 50 ऑक्सिजन बेडस तात्काळ केले जाणार आहेत.
महापौर मोहोळ यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीमुळे गंभीर रुग्णांना भेडसावणाऱ्या बेड्सच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरात नव्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडच्या संदर्भात मोठ्या अडचणी निर्माण होऊन पुणेकरांचा तक्रारी वाढत होत्या महापौर मोहोळ यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या विषयात लक्ष घालून नव्या भेटच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात ऑक्सिजन, आयसीयू आणि वेंटीलेटर बेड्सची तातडीने आवश्यकता असून यासाठी आम्ही वेगाने पावले उचलत आहोत. बैठकीच्या माध्यमातून आढावा घेत नजीकच्या काळातील नियोजन करणे आवश्यक होते, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपलब्ध बेडच्या संख्येची सविस्तर माहिती घेत नव्याने कराव्या लागणाऱ्या बेडच्या निर्मितीबाबत सविस्तर चर्चा करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
माझी पुणेकरांना विनंती आहे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत सहकार्य करावे. टेस्टची संख्या वाढविल्याने पुणे शहरात रुग्ण संख्येचे प्रमाणही अधिक होत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर, ज्यांनी टेस्टिंगची संख्या वाढविली अशा भागात वेगाने संसर्गावर नियंत्रण मिळवता आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी न करता आगामी काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे महापौर म्हणाले.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांसोबत भाजपची बैठक
पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) सकाळी 11.30  वा. भाजपची आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.
पुणे शहर भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिका पदाधिकारी यांची कोरोना आणि मनपा संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. पुणे शहरात आता कोरोनाचे 39 हजार 203 रुग्ण झाले आहेत. शहरात सक्रिय रुग्ण 14 हजार 757 आहेत.  23 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 1 हजार 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटातून पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
नवनियुक्त आयुक्तांसोबत प्रथमच अज भाजपची बैठक होत आहे. आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर करून 8 दिवस झाले आहेत. आणखी 2 दिवस लॉकडाऊन चालणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त आणखी काही कठोर निर्णय घेणार का याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. तर, 23 जुलैनंतर आता लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.